कुडाळ दि. 12 – 26/11 च्या मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात आतंकवादी अजमल कसाबला जिवंत पकडून देणारे जावली तालुक्याचे सुपुत्र पोलीस उपनिरीक्षक शहीद तुकाराम ओंबळे यांच्या स्मारकाचा प्रश्न अखेर 14 वर्षानंतर मार्गी लागला असून येत्या 26 नोव्हेंबरला ओंबळे यांच्या स्मृतीदिनादिवशी केडंबे, ता. जावली या त्यांच्या मूळगावी स्मारकाचे भूमिपूजन करणार असल्याची ग्वाही राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली आहे.
शहीद तुकाराम ओंबळे यांचे त्यांच्या कार्यानूरूप स्मारक त्यांच्या मूळ गावी व्हावे, अशी समस्त जावळीकरांची इच्छा होती, यासाठीच शिवसेना सातारा जिल्हा सहसंपर्कप्रमुख एकनाथ ओंबळे यांनी मुख्यमंत्री आणि सातारा जिल्ह्याचे सुपुत्र एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. अखेर त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असल्याचे त्यांनी सांगितले तसेच येत्या 26 नोव्हेंबरला ओंबळे यांच्या स्मृतीदिनादिवशी केडंबे, ता. जावली या त्यांच्या मूळगावी स्मारकाचे भूमिपूजन राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई व मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार असल्याचीही माहीती त्यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईत दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्याने केवळ भारतच नाही तर संपूर्ण जग हादरले. 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईत लष्कर-ए-तैयबाच्या 10 दहशतवाद्यांनी हा हल्ला केला होता. या हल्ल्यात 160 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला अतर 300 हून अधिक जण जखमी झाले. 26 नोव्हेंबरला मुंबई हल्ल्याला 14 वर्षे पूर्ण झाली, पण मुंबई हल्ल्याच्या जखमा अजूनही लोकांच्या मनात ताज्या आहेत. अजमल कसाब हा एकमेव पाकिस्तानी दहशतवादी होता जो मुंबई हल्ल्यात जिवंत पकडला गेला होता. कसाबला शहिद तुकाराम ओंबळे यांनीच पकडले होते , कारण तुकाराम आोंबळे यांनी कसाबच्या AK-47 रायफलची बॅरल हिसकावून घेतली. तो त्यांच्यावर गोळीबार करत राहिला, पण आोंबळे यांनी त्याला सोडले नाही. तुकाराम ओंबळे यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता AK-47 चा सामना केला आणि दहशतवादी कसाबला जिवंत पकडले होते.
शहीद तुकाराम ओंबळे यांच्या स्मारकाचे दि. 26 नोव्हेंबरला केडंबे येथे भूमिपूजन एकनाथ ओंबळे यांची माहीती