

कुडाळ दि. 8 – सातारा जिल्ह्यातील मेढा पोलीस ठाण्यात युवकांच्या मारामारी नंतर गुन्हा दाखल करण्यावरुन राडा झाला. यावेळी दोन गट एकमेकांमध्ये भिडले. त्यामुळे मेढा पोलीस ठाण्यात तणावाचं वातावरण होते. या घटनेनंतर पोलीसांनी एका गटाच्या प्रमुख कार्यकर्त्यांवर शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. याबाबतची माहिती मेढा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अमोल माने यांनी दिली.
सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातून नुकतेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या संचालकपदी निवडून आलेल्या संचालकाच्या नातेवाईकाची आणि जावळीत आजही आपला दबदबा असावा अशी सुप्त इच्छा बाळगलेल्या एका नेत्याच्या कार्यकर्त्याची वाहन चालविण्यावरुन वादावादी झाली. त्याचे पर्यवसन मारामारीत झाले.

दोन्ही युवकांनी मारामारी झाल्यानंतर आपल्या सहकारी मित्रांना याची कल्पना दिली. त्यानंतर जिल्हा बॅकेचे नवनिर्वाचित संचालकाच्या गटानं दुस-या युवकाला मारलं. त्यामुळे वाद वाढला. त्यानंतर दोन्ही गट भिडले. दोन्ही गटांनी पोलीसांत तक्रारी दाखल केल्या. पोलीसांनी दोन्ही गटाचे म्हणणे लक्षात घेत गुन्हा दाखल केला. दोन गटात झालेल्या हमरीतुमरीच्या प्रकारामुळं पोलीस ठाण्यातच वातावरण तंग झाले. या सर्व प्रकाराचा व्हिडिओ समाज माध्यमात व्हायरल झाला आहे.

