महेश बारटक्के
कुडाळ दि. 6 – कोरोनाच्या काळात शासनाच्या नियम अटी निर्बंधामुळे दोन वर्ष विजयादशमी निमित्त सीमोल्लंघनाच्या कार्यक्रमाला मर्यादित स्वरूप प्राप्त झाले होते. यंदा मात्र कोरोना संबंधित कोणतेही निर्बंध नसल्याने मोठ्या उत्साहात कुडाळमध्ये सीमोउल्लंघनाचा कार्यक्रम पार पडला. चांगभल बोला…चांगभलं… पिंपळेश्वराच्या नावानं चांगंभल च्या जयघोषात कुडाळचा पारंपारिक दसरा व पालखी सोहळा दिमाखदार स्वरूपात व अलोट गर्दित पार पडला. बुधवारी दुपारी 3 वाजता सुरू झालेला पालखी सोहळा गुरूवारी दुपारपर्यंत अभूतपुर्व उत्साहात सूरूच राहीला.
श्री पिंपळेश्वर श्री वाकडेश्वर मंदिर कुडाळ येथे सीमोल्लंघनासाठी श्रींच्या पालखीचे दुपारी 3 वाजता प्रस्थान झाले. त्यानंतर कुडाळ बाजारपेठेतून हायस्कुल मार्गे सरताळे गावच्या वेशीवर आगमन होऊन साडे चार वाजता आपट्यांच्या पानांचे पूजन झाले. दोन्ही गावांच्या वेशीवर आलेल्या सर्व पालख्यांसमोर तुतारी व शंखनाद झाला. श्री पिंपळेश्वर वाकडेश्वर पालखी दर्शनासाठी भाविकांनी यावेळी मोठी गर्दी केली होती. आपटा पुजन झाल्यानंतर प्रत्येक पालखीने गाव प्रदक्षिणा पूर्ण करत आपल्या मंदिरा स्थळा कडे प्रस्थान केले. यावेळी येथे नागरिक एकमेकांना आपट्यांची पान देत गळाभेट घेऊन दसऱ्या निमित्त सर्वांना शुभेच्छा देत होते. त्यांनतर श्रींच्या दोन्ही पालख्या सर्जापुर मागार्वरून युवकांनी पळवत पळवत पिंपरतळे या ठिकाणी आणल्या. त्याठिकाणीही आपट्यांच्या पानांचे पूजन झाले. गोपाळपंथाची वाडी, पानस येथील भाविकांनी या ठिकाणी गर्दी करत श्रींचे दर्शन घेतले तर महिलांनी आोवाळणी करत भक्तीभावाने पुजन केले.
त्यांनतर तुळजाभवानी मंदिर (माळी आळी) येथे श्रींच्या पालखींचा विसावा झाला व रात्री 10 वाजता पुन्हा एकदा संपुर्ण गावातुन श्रींच्या पालखीची मिरवणुक काढण्यात आली, यावेळी गावातील प्रत्येकाच्या दारासमोर पालखी थांबवून आोवाळणी करण्यात आली, प्रत्येकाच्या दारात आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती, ठिकठिकाणी मंडप उभारण्यात आले होते, रस्त्याच्या दुतर्फा विद्युत रोषणाई करण्यात आली होती, स्वागत कमानी उभारण्यात आल्या होत्या, पालखीच्या आगमानावेळी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येत होती, एकमेकांना पेढे वाटण्यात येत होते, त्यानंतर पहाटे सात वाजता पुन्हा बाजारपेठेत पालखींचे आगमन झाले त्यांनतर वारागडे आळी, पवार आळी, फुलस्ती मंदिर मार्गे श्रींची आोवाळणी करतकरत पालख्यांचे मंदिराकडे प्रस्थान झाले. तब्बल 24 तासांहून अधिक काळ हा पालखी सोहळा सुरूच होता. दसऱ्याच्या निमित्ताने मंदिराला आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली होती. या कार्यक्रमाला कुडाळ पोलीस स्टेशन यांचेही विशेष सहकार्य लाभले. समस्त कुडाळकर ग्रामस्थांच्या व पालखीचे सर्व मानकरी यांच्या सौजन्याने हा कार्यक्रम उत्साहात व आनंदात पार पडला. सायंकाळी पाचच्या सुमारास वरुणराजाने काही वेळ हजेरीही लावली होती.