सातारा- बचत, काटकसर आणि नेटके नियोजन याद्वारे अजिंक्यतारा साखर कारखाना प्रगतीपथावर पोहचला आहे. संस्थेची प्रगती आणि सभासद- शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती हे स्व. भाऊसाहेब महाराजांचे स्वप्न साध्य झाले असून सभासद, शेतकरी आणि कामगार हे आपल्या कारखान्याचा कणा आहेत, असे स्पष्ट करून कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी गाळप झालेल्या ऊसाला प्रतिटन १४१ रुपये तिसरा हप्ता आणि कामगारांना १८ टक्के बोनस देणार असल्याचे दसऱ्यापूर्वीच जाहीर केले. त्यामुळे सभासद, शेतकरी आणि कामगारांचा दसरा- दिवाळी गोड झाली आहे. दरम्यान, सभासद, शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून कारखान्याची घोडदौड सुरु असून शेतकरी, सभासद हिताशी कधीही तडजोड केली जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
शेंद्रे ता. सातारा येथील अभयसिंहराजे भोसले सांस्कृतिक हॉल येथे अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याची ४० वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात, मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या सभेत आ. शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. यावेळी कारखान्याचे चेअरमन यशवंत साळुंखे, व्हा. चेअरमन नामदेव सावंत, कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते, सर्व आजी, माजी संचालक, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव, माजी सभापती सतीश चव्हाण, किरण साबळे- पाटील, प्रतीक कदम, माजी पंचायत समिती सभापती सरिता इंदलकर, मिलिंद कदम, धर्मराज घोरपडे, जिल्हा बँकेच्या संचालिका कांचन साळुंखे, सुरेश सावंत आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उच्चांकी गाळप करणाऱ्या १९ शेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला.
सभेच्या सुरुवातीला कार्यकारी संचालक मोहिते यांनी सभेपुढील १८ विषयांचे वाचन केले. सभासदांनी हात वर करून एकमताने सर्व विषयांना मंजुरी दिली. यानंतर आ. शिवेंद्रसिंहराजेंनी सभासदांनी केलेल्या सूचना आणि प्रश्नांना उत्तरे देऊन उपस्थित केलेल्या समस्यांचे निवारण केले. कारखान्याची गाळप क्षमता वाढविण्यात आली असून कमीत कमी कालावधीत जास्तीत जास्त गाळप करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दर देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. स्व. भाऊसाहेब महाराजांनी जे स्वप्न पहिले होते ते सत्यात उतरले असून हे दिवस सभासद आणि कामगारांच्या अनमोल सहकार्यामुळे दिसत आहेत हे कोणीही विसरणार नाही. येणाऱ्या उसाला उच्चतम दर देण्यासाठी उपपदार्थांचे उत्पादन वाढवणे तसेच मागच्या हंगामासारखे साखरेची निर्यात करणे हे धोरण आगामी हंगामातही अवलंबण्यात येणार आहे.
अजिंक्यतारा साखर कारखाना हा सभासदांच्या मालकीचा आहे. सभासदांच्या मालकीच्या या संस्थेच्या प्रगतीचा आलेख चढता ठेवण्यासाठी संचालकम मंडळ नेहमीच कटिबद्ध आहे. ऊस पुरवठादार शेतकरी, सभासद आणि कामगारांच्यामुळेच हि संस्था भरभराटीस आली असून सभासद, शेतकरी आणि कामगारांचे हित जोपासणे हि संचालक मंडळाची जबाबदारी असल्याचे आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले.
यानंतर दसरा सणाच्या पूर्वीच आ. शिवेंद्रसिंहराजेंनी गळीत झालेल्या उसाला तिसरा आणि शेवटचा हप्ता जाहीर करून प्रतिटन १४१ रुपये शेवटचा हप्ता देण्याचे जाहीर केले. १४१ रुपये याप्रमाणे गाळप झालेल्या ऊसाचे १२ कोटी २७ लाख रुपये संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खाती लवकरच जमा केले जाणार आहेत. तसेच कामगार- कर्मचाऱ्यांना १८ टक्के बोनसही जाहीर केला असून १८ टक्केप्रमाणे ३ कोटी २६ लाख रुपये कामगार कर्मचाऱ्यांना बोनस म्हणून दिले जाणार आहेत. या निर्णयाचे सभासदांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. दसऱ्यापूर्वीच उसाचा तिसरा हप्ता आणि बोनस जाहीर करणारा अजिंक्यतारा महाराष्ट्रातील एकमेव कारखाना असून या निर्णयामुळे शेतकरी, सभासद आणि कामगारांची दसरा व दिवाळी गोड झाली आहे.
संचालक नामदेव सावंत यांनी स्वागत केले. सभेला जेष्ठ संचालक रामचंद्र जगदाळे, लालासाहेब पवार, पंचायत समितीचे माजी उप सभापती अरविंद चव्हाण, माजी सदस्य राहुल शिंदे, जितेंद्र सावंत, सूत गिरणीचे अध्यक्ष उत्तमराव नावडकर, जालिंदर महाडिक, पंडितराव सावंत, अजित साळुंखे, जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष रविंद्र कदम, गणपतराव शिंदे, विक्रम पवार, नितीन पाटील, युनियन अध्यक्ष कृष्णत धनवे, सयाजी कदम यांच्यासह सर्व संस्थांचे पदाधिकारी, सभासद, कार्यकर्ते, कामगार- कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.