कुडाळ ता 29- आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या सहकार्याने अजिक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून प्रतापगड सहकारी साखर कारखाना सुरु होत आहे. गेल्या काही वर्षात सभासद, शेतकरी व कामगारांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले . परंतु आता या दोन्ही कारखान्याच्या संयोगाने जावली तालुक्यात प्रगतीच्या नव्या पर्वाचा प्रारंभ होत आहे. असे प्रतिपादन प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सौरभ शिंदे यांनी केले.
सोनगाव करंदोशी ता. जावली येथील प्रतापगड सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा चेअरमन सौरभ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात नुकतीच संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते.
सभेला कुडाळ सोसायटीचे चेअरमन मालोजीराव शिंदे, प्रतापगड कारखान्याचे व्हा. चेअरमन ऍड. शिवाजीराव मर्ढेकर,संचालक राजेंद्र शिंदे, बाळासाहेब निकम,आनंदराव मोहिते, शांताराम पवार, अंकुश शिवणकर, रामदास पार्टे, आनंदराव शिंदे, प्रदीप तरडे, आनंदराव जुनघरे, गणपत पार्टे, नानासाहेब सावंत, दिलीप वांगडे, बाळकृष्ण निकम, विजय शेवते, शोभाताई बारटक्के, ताराबाई पोफळे उपस्थित होते.
प्रारंभी माजी आमदार कै. लालसिंगराव शिंदे व दिवंगत चेअरमन राजेंद्र शिंदे यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. संचालक बाळासाहेब निकम यांनी उपस्थितांचे स्वागत केले. व्हा. चेअरमन ऍड. शिवाजीराव मर्ढेकर यांनी प्रास्ताविक केले. प्रभारी कार्यकारी संचालक राजेंद्र भिलारे यांनी नोटीस व प्रोसिडींग वाचन केले.ताळेबंद वाचन अकौंटंट तुकाराम पवार यांनी केले. संचालक आनंदाराव उर्फ प्रदीप पवार यांनी आभार मानले.